रांगोळी, कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे किल्ले. जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. पण, दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगात ओढ कमी झाली आहे. लहानांच्या विश्वातला आणि मोठय़ांच्या आठवणीतला असा हा दिवाळीचा किल्ला!
दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहासाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे. खरेतर कुठल्याही किल्ले उभारणीतून आधी आम्ही भूगोलाच्या जवळ जातो आणि मग इतिहासाशी गट्टी जमते. या परंपरेतूनच आमचे गडकोटांविषयी प्रेम वाढते. पुढे दुर्गभ्रमंतीची आवड जडते.
हाच धागा पकडून, आम्ही या वर्षी दिवाळीच्या आधी आपल्या सगळ्या सोसायटींमध्ये किल्ला बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते जे फक्त मुलांसाठी मर्यादित नव्हते तर मुलांचे पालक, आजी-आजोबा सहभागी झाले होते. आपल्या जवळपास १९ सोसायटींमध्ये २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी हे प्रशिक्षण आयोजित केले होते. सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला. किल्ला बनवायला लागणारे साहित्य, बनविण्याची पद्धत मुलं शिकली. किल्ला बनविताना मुलं मस्त मातीमध्ये खेळत होती आणि त्यांची ख़ुशी बघून त्यांचे पालक ही आनंदी दिसत होते.
दिवाळी च्या निमित्तानी आपण सगळ्या सोसायटींमध्ये दिव्यांची सजावट सुद्धा केली होती. छान दिव्यांच्या माळांनी परिसर उजळून निघाला होता. सोसायटीच्या गेटमध्ये मोठा कंदील आणि क्लब हाऊस मध्ये छोट्या कंदिलांनी सजावट केली होती.