पुणे, दि. १४ नोव्हेंबर २०२२: चंद्र आणि रासलीलेवर आधारित गाण्यांवरील बहारदार कथक नृत्य प्रस्तुती, विविध गीतांचे दमदार सादरीकरण, सोबतीला होणारे तरल निवेदन आणि जवळपास प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून मिळणारी ‘वन्स मोअर’ आणि टाळ्यांची उस्फूर्त दाद अशा उत्साही वातावरणात एक संगीतमय संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते ‘ यूं सजा चाँद’ या सांगीतिक कार्यक्रमाचे.
बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित हा कार्यक्रम विधी महाविद्यालय रस्ता येथील भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिटयूट’च्या अँफिथिएटर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमात ज्येष्ठ कथक नृत्यांगना मधुरिता सारंग, पं. राजेंद्र गंगानी यांच्या शिष्या कथक नृत्यांगना श्रद्धा हर्डीकर-शिंदे नृत्यांगना आणि अर्चना अनुराधा यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नृत्य प्रस्तुती केली. गायिका रश्मी मोघे, राजेश्वरी पवार आणि गायक अजित विस्पुते यांनी विविध गाणी सादर केली. याप्रसंगी विलास जावडेकर डेव्हलपर्स’चे संस्थापक व अध्यक्ष विलास जावडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जावडेकर, तांत्रिक विभागाचे संचालक सर्वेश जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात ‘आज हरी अद्भुत रास उपायौ’ या अजित विस्पुते यांनी गायलेल्या रास गीतावरील नृत्य सादरीकरणाने झाली. त्यानंतर ‘मोरे पनघट पे नंद लाल छेड गयो रे’ ‘चंदा रे चंदा रे कभी तो जमीं पर आ’ या नृत्यरचना ‘चांदण्यात फिरताना’, ‘ रातभर चंद्र तो’, ‘यूं सजा चाँद’, ‘जीव रंगला, दंगला’, ‘ तुम और याद आये’ ही गीते सादर झाली. कार्यक्रमात सादर झालेल्या ‘चलते चलते’, ‘ थाडे रहिओ’, ‘निगाहे मिलाने को दिल चाहता है’ या नृत्य प्रस्तुतींना तसेच ‘अधिर मन झाले’, ‘ललाटी भंडार’, ‘ हे सुरांनो चंद्र व्हा’ या गीतांच्या सादरीकरणाला रसिकांची विशेष दाद मिळाली. ‘झुठे नैना बोले साची बतिया’ या स्वर भैरवीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात चित्रकार विकास पाटणेकर यांनी चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर केले.